पुस्तक परिचय : लोकमानसातील काव्यात्म बालकथा - डॉ. सुरेश सावंत

शालेयवृत्त सेवा
0

 




जागतिक लोककथांवर आधारित डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचा 'सवंगडी' हा बालकथासंग्रह  दिलीपराज प्रकाशनाकडून नुकताच प्रकाशित झाला आहे.  ह्या पुस्तकात आपल्याला छान छान अशा ४ बालकथा वाचायला मिळतात. ख्रिस्ती लोकमानसात रुजलेल्या ह्या कथा वाचकांना वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. ह्या कथा एकतर येशूच्या जन्माशी निगडित आहेत किंवा सांताक्लॉजच्या आनंदयात्रेशी संबंधित आहेत.


'कोकरू' ह्या पहिल्या कथेची नायिका आहे शेफाली नावाची चिमुरडी. शेफालीला चित्रांची भारी आवड. कोकरू खांद्यावर घेतलेल्या येशूचे एक चित्र शेफालीच्या समोर आहे. त्या चित्रातील कोकराचा आणि येशूचा संवादच शेफालीला ऐकायला येतो आहे. कोकराने विचारलेले बालसुलभ प्रश्न आणि येशूने तितक्याच प्रेमळपणे त्याला दिलेली दिलखुलास उत्तरे, असा हा संवाद खुलत जातो. कोकरू आणि येशू यांच्या कानगोष्टींतून ही कथा फुलत जाते. हळुवारपणे एखाद्या पाकळीचे फुलात रूपांतर व्हावे, तशी येशू ख्रिस्ताच्या जन्माची ही कथा उलगडत जाते.


आपल्या जन्माचे गुपित सांगताना येशू कोकराला म्हणतो, "माणसातलं जनावर जागं झालं की ते हिंस्र बनतात आणि प्राण्यातली माणुसकी जागी होते, तेव्हा ती त्यांच्यावर प्रेम करणा-या माणसांच्या अधिक जवळ येतात, म्हणून मी गोठ्यात... जनावरांच्या मेळाव्यात जन्माला आलो".

कथेच्या शेवटी येशू कोकराला म्हणतो, "कोकराच्या मनातला निर्मळ भाव आपण आपल्यात बिंबवावा... जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले... तोचि साधू ओळखावा अन् देव तेथेचि जाणावा".

ह्या संवादाच्या माध्यमातून लेखिकेने बालकुमार वाचकांना संवेदनशीलतेचा आणि मनाच्या निर्मलतेचा संदेशच दिला आहे.


'पायमोज्याची मज्जा' ही दुसरी कथा जगभर आनंद वाटत फिरणारा सांताक्लॉज आणि त्याच्या गाडीला जुंपलेले रेनडीअर ( हरणे) यांच्या संवादातून साकार होते. सांताक्लॉज म्हणजेच नाताळबाबा नाताळात येशूच्या जन्माच्या आधल्या रात्री खाऊ, खेळणी, मिठाई मोज्यात गुपचूप ठेवून येत असतो. मोजा जेवढा मोठा, तेवढी मोठी मज्जा!

हा सांताक्लॉज म्हणजे ग्रीक बिशप सेंट निकोलस. ज्या दिवशी जगाचा तारणहार येशू जन्मला, त्या दिवशी कोणी उपाशी राहू नये, दु:खी कष्टी राहू नये, म्हणून सेंट निकोलस इतरांच्या सुखासाठी समर्पित जीवन जगले, ही नवीन माहिती आपल्याला ह्या कथेत मिळते. हा पायमोजा एकच का, तर संपूर्ण जगाला व्यापून उरणारे मानवतेचे पाऊल आहे. ह्या कथेतील व्यक्ती आणि प्राणी यांच्यातील संवाद मोठा मजेशीर आहे! ह्यात जागतिक संस्कृतीचा संगम आहे. 


तिसऱ्या कथेचे शीर्षक आहे 'गाऊली'.

'गाय' ह्या रूढ शब्दासाठी लेखिकेने 'गाऊली' हा लडिवाळ शब्द योजिला आहे. ही येशूच्या जन्माची ह्रदयस्पर्शी गोष्ट आहे. येशूचे मातापिता मेरी आणि जोसेफ यांच्या उपेक्षेची ही भावस्पर्शी गोष्ट आहे. येशूच्या जन्माच्या वेळी त्यांना कोणीही आसरा देत नाही, त्यावेळी ते एका गोठ्यात आसरा घेतात. गोठ्यात असलेल्या गायींनी मेरीचे बाळंतपण केले, मेरीला धीर दिला, अशी कल्पना लेखिकेने केली आहे. येशूच्या जन्माने गायी आणि वासरांना आनंदावेग आवरत नव्हता, असे वर्णन केले आहे. ह्या विधानातून लेखिकेने माणूस आणि प्राणी यांच्यातील सनातन प्रेमाचे नाते अधोरेखित केले आहे. येशूच्या जन्मामुळे जोसेफच्या हातातील वाळलेल्या काठीला शुभ्र सुगंधी फूल उमलले. देवाची लीला अन् फुले लगडली काठीला, हे प्रासयुक्त चमत्कृतीपूर्ण वर्णन बालकुमार वाचकांना आवडणारे आहे. गायींच्या आणि वासरांच्या वत्सल भावना लेखिकेने फारच छान टिपल्या आहेत.


'गाणारे झाड' ह्या कथेत रिबेका, रोहित, नॉरिस्का आणि शलाका हे बाळगोपाळ नाताळची सजावट करत असतात.

सजावटीसाठी जमवलेली ख्रिस्तवेदनाकंद (कृष्णकमळ), ख्रिस्तजन्मपुष्प ( ब्रह्मकमळ), ख्रिसमस ट्री ( नाताळ झाड), मे फ्लॉवर, पॅशन फ्लॉवर, जास्वंद, गुलाब, मोगरा, बोगनवेल, पॉईनसेतिया ही देशी आणि विदेशी झाडे आपसात बोलायला लागतात. ह्या झाडांच्या आणि फुलांच्या सौंदर्याची वर्णने वाचकांच्या मनाला मोहिनी घालतात. ह्या झाडांच्या संवादातून 'गाणारे झाड' ही कथा आकाराला येते.

बोगनवेल म्हणते, "फूल तर एकाच प्रकारचे, एकाच मातीतून आलेले, पण ख्रिस्ती लोकांना त्यात बालख्रिस्त दिसतो, तर हिंदूंना त्यात बाळकृष्ण दिसतो".

'सारी माणसं मानवजात म्हणून एकच आहेत, त्यांचे धर्म, समाज वेगवेगळे असले तरी!' असा वैश्विक एकात्मतेचा संदेश ही कथा देऊन जाते. झाडाचं रक्षण केलं पाहिजे. झाड वाचवलं पाहिजे, हा निसर्गरक्षणाचा संस्कार ही कथा बिंबवून जाते.

पेपिटा आणि पेद्रू ह्या बहीण भावाच्या संवादातून 'आपण जे प्रेमाने देतो, त्याला ह्रदयाचा रंग चढतो आणि ते देवाला पोचतं' असा संदेश ही कथा देते. दानाची भावना जागवून जाते. 


मराठी बालसाहित्यात ख्रिश्चन धर्म, ख्रिस्ती संत महात्मे, विभूती, प्रेषित, ख्रिस्ती धर्मश्रद्धा यांची वर्णने अभावानेच आढळतात. डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी ह्या कथासंग्रहाच्या माध्यमातून ही उणीव भरून काढली आहे. येशूचा जन्म, येशूच्या जन्माच्या वेळी  मेरी, जोसेफ आणि येशूची झालेली उपेक्षा, सांताक्लॉजची परोपकारी वृत्ती इ. गोष्टींना लेखिकेने उत्कृष्ट कथारूप दिले आहे. कथांची वातावरणनिर्मिती अतिशय चित्रदर्शी पद्धतीने केली आहे. ह्या कथांच्या माध्यमातून लेखिकेने भारतीय आणि ख्रिस्ती धर्मसंस्कृती व जीवनधारणा यांचा अनुबंध अधोरेखित केला आहे. बालकुमार वाचकांच्या मनावर करुणा, प्रेम, परोपकार, सहवेदना, एकात्मता, निष्काम भक्ती, निसर्गप्रेम इ. मूल्यांचा संस्कार बिंबविण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या कथांच्या माध्यमातून लेखिकेने विविध मानवी वृत्तीप्रवृत्तींचे दर्शन घडविले आहे. भाषेचे वैभव आणि भाषेचे सौंदर्य ही ह्या कथासंग्रहाची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. पिढ्यानपिढ्या लोकमानसात नांदत असलेल्या ख्रिस्ती लोककथांचा आधार घेऊन मानवी जीवनातील पशुपक्ष्यांचे आणि वृक्षवल्लींचे महत्त्व सांगितले आहे. मुळात डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचा ललितलेखनात हातखंडा आहे. त्यांनी प्रत्येक कथेचा शेवट एका समर्पक कवितेने केला आहे. त्यामुळे लेखिकेची ललितरम्य आणि काव्यात्म लेखनशैली बालकुमार वाचकांच्या मनावर गारूड करील, अशीच आहे. ह्या संवादात्म कथा वाचत असताना इसापनीती, जातककथा आणि पंचतंत्रातील बोलणा-या पशुपक्ष्यांची आठवण जागी होते. 


ज्येष्ठ कवी उत्तम कोळगावकर यांनी प्रस्तावनेत ह्या कथेचे वेगळेपण नमूद केले आहे. संतोष घोंगडे यांनी आकर्षक मुखपृष्ठ आणि बोलक्या चित्रांच्या माध्यमातून पुस्तकाच्या सौंदर्यात मोलाची भर घातली आहे. दिलीपराज प्रकाशनाने आर्ट पेपरवर रंगीत छपाई करून पुस्तकाची उत्तम निर्मिती केली आहे. 

सौहार्दपूर्ण सहजीवनासाठी बहुधर्मीय सांस्कृतिकता असलेल्या आपल्या देशात उगवत्या पिढीला इतर धर्मसंस्कृतींची  माहिती असणे आवश्यक असते. त्या दृष्टीने ह्या कथासंग्रहाला मराठी बालसाहित्यात विशेष महत्त्व आहे.


सवंगडी ( बालकथासंग्रह)

-डॉ. सिसिलिया कार्व्हालो

दिलीपराज प्रकाशन, पुणे.

पृष्ठे ४४.          किंमत रु. १३०

_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _


पुस्तक परिचय :

डॉ. सुरेश सावंत, नांदेड

भ्र. ९४२२१७०६८९, ८८०६३८८५३५.

sureshsawant2011@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)