जिवंत प्रेरणेचा झरा स्वामी विवेकानंद !

शालेयवृत्त सेवा
0

 



 स्वामी विवेकानंद आजच्या युगाचे प्रेरणास्थान आहेत.त्यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी माता भुवनेश्वरी व पिता विश्वनाथ बाबू यांच्या पोटी झाला.त्यांचे वडील पेशाने वकील होते. त्या उभयतांचा स्वभाव उदार व दुःखितांविषयी कणव असणारा होता. मातापित्यांनी नरेंद्रवर उत्तम संस्कार केले.त्यांचा जन्मदिवस आपण 'युवक दिन' म्हणून  साजरा करतो. त्यांनी लोकांना मानवतेचा धडा शिकवला. स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृतीला नवा अर्थ दिला आणि भारतीय परंपरा व पाश्चात्त्य  विज्ञाननिष्ठा याची कास धरली.समाजामध्ये विवेकनिष्ठ विचार प्रस्थापित व्हावा यासाठी ते सतत धडपडले.


स्वामी विवेकानंदांनी  रामकृष्ण मिशनची स्थापना १८९७ साली केली.  रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरू होते. रामकृष्णाकडून  प्रेरणा घेऊन त्यांनी धार्मिक सुधारणेचे कार्य केले.कर्मकांड ,अंधश्रद्धा व अत्यंतिक ग्रंथप्रामाण्य सोडा.  विवेक बुद्धीने कर्माचा अभ्यास करा. मानवाची सेवा हाच खरा धर्म आहे. अशी शिकवण त्यांनी लोकांना दिली. त्यांनी  जाती व्यवस्थेवर हल्ला चढविला.त्यांनी  मानवतावाद  व विश्वबंधूत्वाचा पुरस्कार केला.स्वामी विवेकानंदांवर बुध्दांचा फार प्रभाव होता ते म्हणतात “बुद्धांच्या ह्रदयाचा एक लक्षांशही मला लाभला तर मी स्वत:ला धन्य मानेल",ते पुढे असे म्हणतात 

"बुद्ध हे एक थोर समाज सुधारक होते. भारतातील थोर तत्त्वज्ञांमध्ये बुद्ध हेच  एकमेव होते की, ज्यांना जातिभेद मान्य नव्हता. इतर सर्वच दार्शनिकांनी वा तत्त्वज्ञांनी थोड्याबहूत प्रमाणात सामाजिक अंधविश्वासांना कुरवाळलेच आहे. समाजाच्या खुळचट समजुतींची खुशामत केली आहे.” मानवामानवातच काय पण मनुष्य आणि पशू यांमध्ये देखील जी विषमता आढळते तिचा बुद्धांनी निषेध केला आहे. “जगातील सर्व आचार्यांमध्ये वा धर्म संस्थापकांमध्ये बुद्ध हे एकटेच असे आहेत, की ज्यांच्या कार्याला बाहेरील कोणताही हेतू प्रेरक नव्हता. इतर सर्वांनीच आपण ईश्वरावतार, ईश्वरदूत, ईश्वरपुत्र आहोत अशी घोषणा केलेली आहे, आणि ते असेही सांगून गेले आहेत की, त्यांच्यावर जो विश्वास ठेवील तोच स्वर्गी जाईल, मुक्त होईल. पण बुद्ध मृत्यूच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हेच म्हणत असत, “कुणीही तुम्हाला मुक्त होण्यासाठी साहाय्य करू शकणार नाही. स्वत:च स्वत:ला साहाय्य करा, स्वत:च्याच प्रयत्नांची मुक्त व्हा ” स्वत: संबंधी ते म्हणत, "बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे आकाशाप्रमाणे अनंत ज्ञानसंपन्न;  सिद्धार्थ गौतमाने ती अवस्था प्राप्त करून घेतली आहे. तुम्ही सुध्दा प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर तुम्हालाही ‘बुद्धत्व’ प्राप्त होऊ शकेल."

(संदर्भ - भगवान बुद्ध आणि त्यांची शिकवण : 

लेखक - स्वामी विवेकानंद ) 


सन १८९३ मध्ये अमेरिकेत शिकागो इथे भरलेल्या जागतिक सर्वधर्म  परिषदेमध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनीनो असे उद्गार काढून विश्वबंधुत्व स्थापन केले.

या परिषदेनंतर स्वामी विवेकानंद दोन वर्ष अमेरिकेत कार्यरत राहिलेली एकदा स्वामी विवेकानंद शिकागो येथील नदीच्या काठाने फिरत होते.तेव्हा नदीच्या धारेत तरंगणाऱ्या अंड्यांना नेम धरून फोडणारी काही मुले त्यांनी पाहिली. नदीच्या पात्रातील पाण्याची धार जलद असल्याने व अंड्याची कवचे हलकी असल्याने ती त्या धारेत खाली वर होत होती आणि वेगाने पुढे पुढे सरकत होती. मुलांनी ती फोडण्याचा खूप प्रयत्न केला पण  एकालाही ते जमले नाही. हे सारे दृश्य स्वामीजी तेथे उभे राहून पाहत होते. त्यांनी एका मुलाजवळील एक छर्याची बंदूक घेतली  अन्.लागोपाठ बारा अंडायाची कवचे नेम धरून बरोबर फोडली.मुलांना खूप आश्चर्य वाटले.त्यातील एकाने विचारले," "स्वामीजी सराव नसतानाही आपण बरोबर नेम कसा धरू  शकतात? कोणतेही काम आवडीने व मन लावून,एकाग्र चित्ताने केले तर  सहजपणे करता येते. ते  काम करताना इतर कोणत्याही  गोष्टीचा विचार मनात येता कामा नये.


अमेरिकेत दोन वर्षे राहिल्यानंतर स्वामीजी इंग्लंडला आले.येथेही त्यांनी अनेक व्याख्याने दिली. इंग्लंडमध्ये त्यांना अनेक अनुयायी मिळाले कु. मार्गारेट नोबेल यांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारून भगिनी निवेदिता हे नाव धारण केले.सन १८९६  च्या अखेर ते भारतात परतले पाश्चात्य देशातील सुबत्ता,समृद्धी पाहून स्वामी विवेकानंदांना भारतातील दैन्य व हलाखी  अधिक जाणवली भारतातील अनंतरूपी दुःखे  जाणवल्याने त्यांचे हृदय पिळवटून निघाले.म्हणून  त्यांनी १८९७ मध्ये त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली.संन्यस्त वृत्तीने समाजसेवा करीत राष्ट्राची  उभारणी करण्याचे कार्य '  रामकृष्ण  मशिनने हाती  घेतले .राष्ट्र उभारणीचे दिव्य स्वप्न उराशी बाळगून कार्य करीत असतानाच स्वामी विवेकानंदांची प्रकृती मात्र खंगत चालली होती. त्यातच त्यांना दम्याचा विकार जडला. रात्र-रात्र झोप लागत नसे. त्याही परिस्थितीत ते १८९९ साली  पुन्हा अमेरिकेला गेले तेथे त्यांनी न्यूयॉर्कमध्ये 'वेदांत सोसायटीची' स्थापना केली. कॅलिफोर्नियात 'शांती आश्रमाची' स्थापना केली. 


पॅरिसमध्ये भरलेल्या धर्म -उत्क्रांती परिषदेतही उपस्थितीत  राहून ते भारतात परतले. या प्रवासात स्वामीजींना मधुमेहाचा विकारही जडला. तरी पञव्यवहार,  लेखन, प्रवचने व्याख्याने, आश्रमवासीयांना शिकवणे असे त्यांचे बहुविध कार्य उत्साहाने  सुरूच होते.  त्यादरम्यान स्वामीजींना जलोदर या व्याधीने ग्रासले ते कडक पथ्य  पाळू लागले.  पण काळ  जवळ आल्याची त्यांना जाणीव झाली  ४ जुलै १९०२ रोजी  त्यांनी लवकर उठून तीन तास ध्यान केले दुपारी हास्यविनोद करीत भोजन घेतले दोन अडीच तास आश्रमवासीयांचा  अभ्यास  घेतला. त्यांच्याशी  अनेक प्रश्नांवर चर्चा केली व शांतपणे त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांनी भारतीय  तरुणांना आपल्या जीवनातून संदेश दिला आजाराने खंगून मरण्यापेक्षा जीवनाच्या अंतापर्यंत काम करत परिश्रम करत हसत हसत मृत्यूचा स्वीकार करा.अवघे ३९ वर्षे स्वामीजींना आयुष्य  लाभलं पण अल्पावधीतच त्यांनी युगानुयुगांचे   प्रचंड कार्य केले. अशा या दैदिप्यमान भारतमातेच्या सुपुञास कोटी कोटी प्रणाम. 



लेखक- शंकर नामदेव गच्‍चे

( एम ए बी एड )  जि.प. प्रा.शा.वायवाडी केंद्र पोटा बु. ता.हिमायतनगर जि. मोबाईल नंबर-८२७५३९०४१०

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)