ग्रामीण मातीतील चित्रांचा जादुगार रणजित वर्मा....!!!

शालेयवृत्त सेवा
0

 



            सह्याद्री पर्वतरांगाच्या कुशीत नैसर्गिक संपदा लाभलेले श्रीदत प्रभू, माता रेणूकादेवी, सुफी संत सना उल्लाह बाबा सोनापीर, भगवान बुद्धाची मगध नगरी, अशा नानाविध पवित्र अशा संदर्भाने पावन झालेले माहूरगड, या नगरीला साहित्य, संगीत, क्रीडा, कलेने समृद्ध सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे .नांदेड जिल्हयातील माहूर गावात असलेले व  ग्रामिण भागातील चित्रकार म्हणून रणजित दत्त वर्मा यांचे नाव सुप्रसिद्ध आहे. आपल्या कुंचल्यातून कुशलतेने कौशल्याचा  रंगाविष्कार  गावापासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नेणाऱ्या चित्रकाराचा आज आपण परिचय घेवू.


             आई सुमित्रा व कै. दत्त वर्मा यांच्या पोटी रणजित यांचा जन्म झाला. वडील कै. दत्त वर्मा हे पत्रकार तथा एक ख्यातकिर्त चित्रकार होते. त्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून माहूरची पवित्र भूमी एकेकाळी समृद्ध केली. अशा चित्रकार पित्याने आपल्या मुलास कलेचे बाल कडू दिले व चित्रकलेचा वारसा अखंडीत ठेवण्यासाठी आपल्या मुलाचे गुरू झाले. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ म्हणजे माहूरगड .हे तीर्थक्षेत्र जसे धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिध्द तसे नैसर्गिक समृध्द वारसा मिळालेले ठिकाणही. नदीनाले, डोंगरदऱ्या, पशुपक्षी यांच्या सानिध्यात वाढतांना माहूरचा निसर्ग नजारा हा सुध्दा दुसरा गुरु म्हणावयास हरकत का नसावी? 


         सौंदर्यात्मक अनुभवाविषयी आणि संस्कृतिच्या विविध पैलूंची मांडणी रचनात्मकरित्या त्यांच्या चित्रात पहावयास मिळते. सौंदर्य हे कल्पना शक्तिची अभिव्यक्ती असते. मनमोहक रंगसंयोजन, आकारांची उत्कृष्ठ मांडणी, अवकाश विभाजन अशा वैशिष्टयपूर्ण बाबी त्यांच्या रचना चित्रात आपणांस प्रामुख्याने दिसून येतात. मानवी अनुभव, संवेदना, वर्तन, ज्ञान, मन, भाव आदींची रचना त्यांच्या चित्रात बेमालूमपणे जपली जातात. कला हा कल्पनाशक्तीचा प्रांत असतो असे त्यांचे मानणे आहे. संवेदनाला जाणिवेच्या पातळीवर आणणे म्हणजे तिचा अविष्कार करणे होय. 


             1991मध्ये विद्यार्थीदशेत असतांना  कोल्हापूर येथे शासकिय कला संचलनालय आयोजित महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात राज्यस्तरीय पारितोषिक मिळवले तेव्हापासून आजवर अनेक राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून आपल्या अभिव्यक्तीचा ठसा उमटविला.

माहूर येथील सुप्रसिद्ध चित्रकार रणजित दत्त वर्मा यांचे नेहरू आर्ट सेंटर,मुंबई येथे "8 आर्टिस्ट" या नावाचे चित्रप्रदर्शन दि.21सप्टेंबर ते दि. 27 सप्टेंबर 2021 दरम्यान झाले.यात देश विदेशातील नामवंत अशा आठ चित्रकारांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.


                   या चित्रप्रदर्शनासाठी 'नेशनल ब्रेस्ट कॅन्सर फाउंडेशन'च्या संचालिका 'किरण बेदी' व डाॅ.दिपांकर राॅय  (द ग्लोबल कन्व्हेनर ॲन्ड चेअरमन  इंटरनॅशनल आर्ट एक्ट्स) यांनी प्रोत्साहन देऊन या प्रदर्शनाची संपूर्ण जबाबदारी स्विकारली होती व शुभेच्छा दिल्या.तसेच या प्रदर्शनातील चित्र विक्री ची रक्कम ब्रेस्ट कॅन्सर पिडीतांना दिली गेली. 


                चित्रकार रणजित दत्त वर्मा यांनी 2018 मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या लोकांसाठी कोल्हापूर पुरग्रस्थांसाठी मदतीसाठी च्या चित्रप्रदर्शनात आपली कलाकृती देऊन पुरग्रस्थांसाठी मदत पुरवली होती.सामाजिक जाणिव जपणाऱ्या रणजित वर्मा यांची यापूर्वी ही देश आणि विदेशात अनेक चित्रप्रदर्शने झाली आहेत.त्यांना अनेक राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


आंतरराष्ट्रीय ख्यातीचे माहूरचे चित्रकार रणजीत वर्मा हे गेल्या अनेक वर्षांपासून चित्रकलेची आपली साधना अखंडपणे करत आले आहेत.ते वेगवेगळ्या विषयांवर चित्रांकन करत आपल्या विविधांगी रंगछटेची जादू पसरवत पुढे निघाले आहेत व वेगवेगळ्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.ही बाब विशेष यासाठीही ठरते, कारण ते मुळात प्राथमिक शिक्षक आहेत आणि आपल्या अध्यापनाच्या कार्यास सांभाळून त्यांनी ही गरुडझेप घेतली आहे. 


              नुकतेच दि.05/12/2021.रोजी ललित कला केंद्र, चोपडा, जळगाव येथे शैक्षणिक संकुलातील सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या समारोहात त्यांना उपक्रमशील कलाशिक्षक राज्य पुरस्कार 2021.प्रदान करण्यात आला.

 रणजित वर्मा यांना जन्मदिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा....!!!


- हृदयाक्षर मिलिंद कंधारे



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)