'जिजाऊ ते सावित्री - सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियानाचा समारोप

शालेयवृत्त सेवा
0



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जवळा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये दि. ३ ते १२ जानेवारी २०२२ या दरम्यान ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान राबिवण्यात आले. 'मी जिजाऊ बोलतेय' या एकांकिकेने या अभियानाचा समारोप करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक ढवळे जी. एस., सहशिक्षक संतोष घटकार, विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर, सरपंच साहेबराव शिखरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, माजी सरपंच कैलास गोडबोले, आकाशवाणीचे प्रासंगिक निवेदक आनंद गोडबोले, मारोती चक्रधर, हैदर शेख आदींची उपस्थिती होती. 


या अभियानांतर्गत सर्व शाळांमध्ये ३ आणि १२ जानेवारी या कालावधीत अनुक्रमे जयंतीनिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे तसेच राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन, ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई आणि १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ वेशभूषा, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तसेच किशोरवयीन मुलींसाठी मासिकपाळी व्यवस्थापन उद्बोधनसत्र, विविध विषयांवर निबंधलेखन, यशस्वी महिलांच्या यशोगाथा / मुलाखती, आनंदनगरी प्रदर्शन,  चित्रकला आणि किल्ले शिल्प, पोवाडागायन तसेच समूहगायन, व्याख्याने व परिसंवादाचे आयोजन, एकांकिका / एकपात्री नाटिका आदी उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर जवळ्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मी जिजाऊ ही वेशभूषा स्पर्धा सादर झाली. या बालजिजाऊंचा शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर एकानंतर एक एकपात्री नाटिकांचे सादरीकरण संपन्न झाले. जिल्ह्यात १० जानेवारी पासून शाळा बंद करण्यात आल्या आहेत. जवळ्यात जिजाऊ जयंतीनिमित्त कार्यक्रम घेऊन  सर्व शालेय तथा सहशालेय उपक्रमांना स्थगिती देण्यात आली. 'मी जिजाऊ बोलतेय' ही एकपात्री नाटिका सादर करण्यासाठी श्रुती मठपती, पल्लवी कदम, कल्याणी शिखरे, तेजल शिखरे, वैभवी शिखरे, साक्षी गोडबोले, नंदनी टिमके, अक्षरा गोडबोले यांनी परिश्रम घेतले. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)