युगप्रवर्तक राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ

शालेयवृत्त सेवा
0

 

चीत्र : देव हिरे



"स्ञी जन्माच्या उध्दाराचे श्रेय सावित्रीलाच जाते 

हिंदवी स्वराज्याचे स्वप्न माॕ जिजाऊ पाहते".


कुणबी -मराठ्यांचा इतिहास हा जगाच्या इतिहासातील एक सुवर्ण अध्याय आहे.हा इतिहास घडवणारी महान शक्ती म्हणजे जिजामाता होय.ज्या मातेने हींदवी स्वराज्य स्वप्न पाहील आणि प्रत्यक्षात उतरवल.त्या स्वराज्याच्या संकल्पिका राजमाता,राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म 12-जानेवारी-1598 मध्ये सिंदखेड राजा जि.बुलडाना येथे लखुजी जाधव व म्हाळसाबाई यांच्या पोटी झाला.


                      जिजाऊंच्या आई म्हाळसाराणी अत्यंत धोरणी,मुत्सदी,स्वाभिमानी व धाडसी होत्या.त्यांनी जिजाऊंना मुलांप्रमाणेच घोड्यावर बसणे,तलवार चालवणे,प्रतिपक्षावर हल्ला करणे इत्यादी युद्ध शास्ञातील शिक्षण दिले.

                राजवाड्यात येणाऱ्या मुत्सदी व पराक्रमी लोकांची वर्दळ,लढ्यांचे डावपेच यशापयशाची चर्चा ,जनतेची गार्हाणी न्याबुध्दीने सोडविण्याची लखुजी राजांची हातोटी इत्यादी   बाबींनीही जिजाऊंचे बालमन पुरेसे परिपक्व झाले.


                मराठे सरदार मोहीमेवर असताना राज्यकारभाराची जबाबदारी स्ञीयांवर येत असे.आणीबाणीच्या प्रसंगी हातात शस्ञ घेऊन शञुशी दोन हात करण्याची तयारीही स्ञीयांची असे.प्रसंगी न्यायनिवाडा करण्याची जबाबदारीही त्या पार पाडत.यावरुन त्यावेळी मराठ्यांमध्ये पडदा पध्दती नव्हती असे दिसून येते.पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यांची त्यांची तयारी असे.या सर्व गोष्टीवरुन हे स्पष्ट होते की मराठे वीर पुरुष महीलांना समान दर्जा देत.या सार्या परिस्थितीचा योग्य संस्कार जिजाऊच्या बाल मनावर झाला.


जिजाऊंचा विवाह मोठ्या थाटामाटात देवगीरी येथे इ.स.1610-1611 च्या सुमारास लखुजीराजाने करुन दिला.उत्साही वातावरणात प्रचलित रुढी परंपरेनुसार हा विवाह समारंभ संपन्न झाला. विवाहा नंतर जिजाऊंना आठ अपत्य झाली त्यातील थोरला मुलगा संभाजी व धाकटा शिवाजी हे दोघेच जगले.संभाजी राजांचा जन्म इ.स.1623 मध्ये झाला.त्यानंतर 7 वर्षाच्या अंतराने शिवरायांचा जन्म झाला.


               शिवकालीन कवी परमानंद याने आपल्या 'शिवभारत' या ग्रंथात शिवनेरी गडावरुन बाळाचे नाव शिव ठेवले आसे स्पष्ट म्हटले आहे.या काव्याचा कर्ता शिवरायांच्या घरी भाट होता.त्यामुळे त्याने जिजाऊ मातोश्री व इतरांच्या तोंडून ही गोष्ट ऐकली असण्याची शक्यता आहे.म्हणून त्याचे लिखाण अधिक आधिकृत समजले पाहिजे.

                 शिवरायांसारखा उत्तुंग प्रतिभेचा स्वाभिमानी व महत्त्वाकांक्षी प्रजाहितदक्ष,न्यायप्रिय राजा निर्माण होण्यामध्ये जिजाउंचे व्यक्तीमत्व कारणीभूत होते हे मान्य करावे लागते.त्यांनी आपल्या आयुष्यात अनुभवलेले प्रसंग,सतत संकटाशी केलेला सामना असाह्य दुःखांचे पचवलेले कढ व सततची असुरक्षितता या प्रतिकुल वातावरणाच्या भट्टीतच शिवरायांसारखे बावञकशी सोने उजळून निघाले म्हणून खर्या अर्थाने शिवरायांच्या गुरूस्थानी त्या शोभतात.


                      एकीकडे शिवाजी व संभाजींचे स्वराज्य स्थापनेचे उद्योग चालू होते,तर दुसरीकडे कर्नाटकातील शहांजी राजांच्या मोहीमाही यशस्वी होत होत्या.दोन  वर्षापासून सतत एक एक मोहीम फत्ते करीत शिवाजी राजे यशोशिखरावर पोहचत होते.बाप लेकांच्या यशस्वी कामगिरीने विजापूर दरबारातील काही सरदार अस्वस्थ होते.त्यांनी शहाजीराजांच्या विरोधात चुगलीखोरीची मोहीम उघडली.शहाजी कर्नाटकातील हींदू राजांना मदत करतो व त्यांचा पूर्ण नाश होऊ देत नाही हे व यासारखे आरोप लाऊन जिंजीच्या वेढ्याच्या वेळी मुस्तफाखानने शहाजी राजांना मध्ये राञी अटक केली.शहाजी राजांचा सर्व ऐवज जप्त करुन त्यांना बेड्या ठोकून अफजलखानाने त्यांची अपप्रतिष्ठा करीत विजापूरच्या बादशाहाच्या हवाली केले.या अटकेला आणखी  एक प्रभावी कारण होते "मला तुमच्या आश्रयाला घ्या".या आशयाचे एक पञ शहाजीराजांनी गोवळ कोंड्याच्या कुतुबशाहस लिहिले होते.त्यामुळे शहाजींच्या निष्ठेविषयी आदिलशाहाला संशय आला होता.शहाजींच्या दोन्ही पुञांच्या कारवायांनाही आवर घालण्याचा आदिलशाहाचा हेतू होता.त्यासाठी त्यांनी बंगलोरला संभाजीराजांना जिंकण्यासाठी फरीदखान व शिवाजी राजांना जिंकण्यासाठी फत्तेखान  यांना पाठवले पण या दोघांचाही दारुण पराभव झाला.त्यामुळे नाईलाजाने आदिलशाहने काही अटीवर शहाजी राजांना सोडण्याचे ठरवले.बंगळूर व कंदर्पी हे दोन कील्ले संभाजीने व कोंढाणा हा कील्ला शिवाजीने विजापूरकरांना परत द्यावा म्हणजे शहाजी राजांची सुटका करु असे ठरले.संभाजी राजांने आपल्या अचाट पराक्रमाने मिळवलेले बंगळूर व कंदर्पी हे दोन्ही कील्ले आदिलशाहाच्या स्वाधीन केले.पण शिवाजी राजे माञ कोंढाणा किल्ला देण्यास तयार नव्हते.


एकीकडे महत्त्वाकांक्षी पुञांच्या स्वप्नांची धुळदाण तर दुसरीकडे सौभाग्याचे लेणे पुसले पुसले जाण्याची जीवाचा थरकाप उडवणारी भयकंपित स्थिती,अशा कोंडीत त्या सापडल्या.त्यांनी अशा अवस्थेत शिवबाशी वादही घातला.जिजाऊंसोबत शहाजी राजांनी पाठवलेला मुरब्बी मार्गदर्शक सोनोपंत डबीर यांनी माय-लेकातील भावनिक ताण नाहीसा करीत युक्तिवाद केला,ते म्हणाले,"आदिलशाहाला दिलेला कील्ला उद्या पुन्हा आपल्या पराक्रमाने घेता येईल,पण आपल्या पित्याच्या जीवास काही धोका झाल्यास होणारे नुकसान भरुन निघणार नाही ".शिवबांना क्षणात संभाव्य परिस्थितीचा अंदाज आला.आपल्या मातोश्रीच्या डोळ्यातील अश्रू त्यांना पाहवले नाहीत.आजवर मोठमोठे डोंगर कोसळले तरि कधीही त्या डगमगल्या नाहीत.

                     शहाजी राजे होदेगिरी येथिल अरण्यात शिकारीला गेले असता घोड्याचा पाय रानवेलीत अडकून घोडा व शहाजी राजे दूर फेकल्या गेले व मुर्छित होऊन त्यांचा दिनांक 23-जानेवारी-1664रोजी मृत्यू झाला.शहाजी राजांच्या मृत्यूमुळे जिजाउंवर जणू आकाश कोसळले.आपली सारी शक्ती कुणीतरी हिरावून घेतली असे जिजाऊंना वाटू लागले.पण शिवबाच्या रुपाने शहाजी राजे जिवंत आहेत व त्यांची स्वप्ने साकार करण्याची जबाबदारी आपली आहे या भावनेने या दुःखाच्या पहाडाला त्यांनी दुर लोटले.कारण शहाजी राजांनी बंगळूरहून शिवरायांसाठी स्वतंत्र ध्वज,राजमुद्रा,अनुभवी प्रशिक्षक पाठवले होते.

             स्वराज्य स्थापनेसाठी जिजाऊ सती गेल्या नाहीत.त्यांच्या आई म्हाळसाराणी सती गेल्या नाहीत.शहाजी राजांच्या आई दिपाराणी सुध्दा सती गेल्या नाहीत.त्यांनी सती प्रथेला छेद देण्याचे महान कार्य केले.

                 अफजलखानाला महाराजांनी मारल्या नंतर त्यांच्या अंगरक्षकांनी खानाचे शीर धडावेगळे केले.महाराजांनी खानाच्या शिराला पिंजरा केला व ते राजगडाच्या जिजाऊसाहेबांच्या भेटीसाठी पाठवून दिले.जिजाऊने राजगडच्या बाल्ले किल्ल्याच्या दरवाज्या जवळील कोनाड्यात ते शीर ठेवण्यास सेवकांना सांगितले व त्याची चोख व्यवस्था केली.त्यानंतर खानाचे शीर प्रतापगडाच्या एका बुरजाखाली दफन करण्यात आले.आजही ते ठीकाण 'अफजलखान बुरुज' म्हणून प्रसिद्ध आहे.जिजाऊंच्या या वागण्यावरुन त्यांच्या मधील मानवतेचा सन्मान करण्याची वृत्ती दिसून येते.


               सिद्दी जौहरने पन्हाळगडाला वेढा घालून शिवरायांना कोंडीत पकडले.चार महीने झाले तरी सुटकेचा मार्ग दिसेना त्यावेळी मातोश्री जिजाऊंच्या मातृमनात वीरश्री संचारली त्या उद् गारल्या,"आता शिवावाचून एक क्षणही राहणे अशक्य आहे,मी स्वतः सैन्य घेऊन जाते आणि सिद्दी जौहारचा निकाल लावते.पन्हाळगडावर अडकलेल्या शिवबाला सोडविण्यासाठी मी तो वेढा फोडते".नेताजी पालकराने त्यांना यापासून परावृत्त केले.जिजाऊंच्या या वीरवृत्तीचे व करारीपणाचे यावेळी दर्शन घडते.

          सईबाईंच्या मृत्यूनंतर जिजाऊ मातोश्रीनी संभाजींच्या पालन-पोषणाची जबाबदारी योग्यरितिने पार पाडली.मातृछञ हरवलेल्याभोसले घराण्यातील या एकूलत्या एक बाळाचे जिजाऊंनी खुप कोड-कौतुक पुरविले.त्याच्या शिक्षण व संस्काराची जबाबदारीही त्यांनी आपल्या शिरावर घेतली.संभाजी राजांना आपल्या मातेची आठवण येऊ दिली नाही.संभाजीना जिजाऊच मातृस्थानी होत्या.शंभुराजांवर वयाच्या 17 वर्षापर्यंत जिजाऊंनी वात्सल्याचा वर्षाव केला.


             राज्यभिषेकाच्या वेळी शिवरायांचा शुद्र म्हणून जो अपमान झाला त्यामुळे जिजाऊंचे मन खिन्न झाले व राज्यभिषेकानंतर अवघ्या बारा दिवसानंतर म्हणजे 17-जून-1674 रोजी पाचाड येथे राञी बारा वाजता जिजाऊने शेवटचा श्वास घेतला व एका राष्ट्रमातेचा अंत झाला.त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम.

             अस म्हणतात की इतिहासाच्या पानांमध्ये हरखून न जाता येणाऱ्या भविष्याकडे वाटचाल करावी पण याच इतिहासात असे काही सोनेरी पान असतात जी की आपल्याला आपल्या चुकलेल्या मार्गाची जाणीव करुन देतात,तर येणार्या भविष्याचा मार्गही त्याच्या दिव्याने उजळून टाकतात.

                      आपला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राची लेकर या बाबतीत खरोखरच नशीबवान!कारण तसा वारसाच आम्हाला लाभलेला आहे.आपला इतिहास म्हणजे हिरे माणकाच्या शब्दांनी रचलेले निखळ सोनेरी पान.

              याच महाराष्ट्राच्या एका नव्या इतिहासाला जन्म देणार्या माऊलींची जयंती!हरवलेला स्वाभिमान आणि अस्तित्वाला पुनर्जन्म देणारी माता.आपला पोटचा गोळा स्वराज्यास अर्पण करुन या मातीला आपला पहीला छञपति राजा देणारी माता म्हणजेच राजमाता,राष्ट्रमाता जिजाऊ माॕ साहेब यांची जयंती.

               आजच्या या दिनी आम्हाला एक प्रश्न पडलाय?ज्या इतिहासाचे दाखले देऊन आम्ही नविन पीढी घडवण्याचे स्वप्न पाहतो,निदान त्या इतिहासाने तरी आमच्या या प्रेरणामुर्तीसोबत न्याय केलाय का? जिजाऊ शिवाय शिवबा छञपति झाला असता का?ज्योतीराव कुणाच्या खांद्याला खांदा लावून स्ञी शिक्षणासाठी झगडले असते? या थोर स्ञीयांशिवाय इतिहास हा इतिहास तरी झाला असता का?शेवटी इतिहासाला जन्म द्यायलाही एक माऊलीच लागते हे ही आम्ही विसरलो.


                 ज्या समाजात हजारो वर्षे स्ञीयांना दुय्यम वागणुक दिली जाते.दुर्गा -शक्ती अशी उपमा तर देतात पण सर्वात जास्त अत्याचारही तिच्यावर होतात.मग अशा समाजाला जिजाऊ सावित्री सारख्या असामान्य स्ञीयांची ओळख करुन देण्यात इतिहास का कमी पडला?

                   आजही स्ञी दुय्यमच,मगती दलिताची असो,सवर्णाची असो,हिंदूची असो वा मुस्लिमांची!तीच गुलामगीरी तोच अन्याय!अगदी आमच्या घरा-घरापर्यंत ही असमानता!आजही गर्भातच तीची हत्या केली जाते.मग हे धडधडीत सत्य समोर असताना इतिहासकार का कमी पडले? ह्या असामान्य स्ञीयांचे संस्कार रुजवण्यात.बर ज्यांनी प्रयत्न केले त्याच्या पाठीशी समाज तरी ऊभा राहीला का?आजचा दिवस म्हणजे एक नवा इतिहास जन्माला घालणाऱ्या माऊलीचा जन्म दिवस.

              इतिहास निर्माण करणे म्हणजे झालेल्या चुकांनासुधारुन पुन्हा नवा इतिहास घडविणे....मग आजच्या या दिवशी करु एक संकल्प !


             स्ञीयांचे हिरावलेले हक्काचे स्थान त्यांना प्राप्त करुन देण्याचा!आमच्या माता-भगिनी आणि मुला-मुलींमध्ये जिजाऊ आणि सावित्रीचे संस्कार रुजवण्याचा! येणाऱ्या पिढीला जिजाऊ -साविञी सारख्या स्ञीयांची खरी ओळख करुन देणाऱ्या इतिहासातील हरवलेले हे सोनेरी पान समाजासमोर उघडे करण्याची आज खरी गरज आहे.खात्री आहे येणारा काळ त्यांच्या विचारांनी संस्कारानी उजळून जाईल.

                   याची सुरुवात आपल्या घरापासून करा.तुमच्या मुलींमध्ये जिजाऊ आणि सावित्री बघायला सुरुवात करा.त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!



- शंकर नामदेव गच्‍चे 

जि.प.प्रा.शा.वायवाडी केंद्र पोटा बु. तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड मोबाईल नंबर -८२७५३९०४१०

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)