प्रत्येक शिक्षकाने गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटीबद्ध व्हावे - शिक्षण विस्तार अधिकारी अमिन पठाण

शालेयवृत्त सेवा
0

 



शिक्षण विस्तार अधिकारी अमिन पठाण यांची सेवानिवृत्ती !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

शिक्षण प्रक्रिया अत्यंत व्यापक स्वरुपाची आहे. विद्यार्थी केंद्रीभूत मानून संपूर्ण शिक्षण प्रणाली त्याभोवती फिरली पाहिजे. आजच्या काळात शिक्षक सुविधादात्याच्या भूमिकेत असला तरी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटीबद्ध असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी अमिन पठाण यांनी केले. ते जवळा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सरपंच साहेबराव शिखरे, माजी सरपंच कैलास गोडबोले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे मुख्याध्यापक ढवळे जी. एस., संतोष घटकार, आकाशवाणीचे प्रासंगिक निवेदक आनंद गोडबोले, सरोदे आदींची उपस्थिती होती.  



           शिक्षण विभागाच्या सोनखेड बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी अमिन पठाण यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त जवळा येथील माजी विद्यार्थ्यांकडून सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना पठाण म्हणाले की, पालकांची शिक्षणाबद्दलची अनास्था कमी होऊन एकूणच शिक्षण पद्धतीकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे. आजचा काळ कठीण आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेसमोर विशेषत: शिक्षकांसमोरच नवी आव्हाने उभी राहिली आहेत. ही जबाबदारी पेलण्यासाठी शिक्षकांनी उर्जावान होणे आवश्यक आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार बदलत असताना नव्या संकल्पना आत्मसात करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी स्वत:चीही गुणवत्ता वाढविली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 




          सेवानिवृत्ती निमित्त शिक्षण विस्तार अधिकारी अमिन पठाण यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि भारतीय संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आनंद गोडबोले, संतोष घटकार, मुख्याध्यापक ढवळे जी.एस. यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी पठाण यांच्याप्रति आदरभाव व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक ढवळे जी. एस. यांनी केले. सूत्रसंचालन माजी विद्यार्थी आनंद गोडबोले यांनी तर आभार संतोष घटकार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मारोती चक्रधर, हरिदास पांचाळ, बाळूअप्पा मठपती, पांडूरंग गच्चे, जनार्धन गच्चे, छगन गच्चे, ग्यानोबा गोडबोले, विनोद गोडबोले यांच्यासह माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)