राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ ते १२ जानेवारी दरम्यान जिजाऊ ते सावित्री जयंती निमित्त ' सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियान ! '

शालेयवृत्त सेवा
0

 




मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

 राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राचा लेकींचा अभियानांतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या अभियानामध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे.



या अभियानादरम्यान संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे आणि नियमांचे काटेकोर पालन करावे असेही त्यांनी म्हटले आहे. असंख्य अडचणींवर मात करून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारी रोजी साजरी करण्यात येते तसेच त्यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिवरायांना शूर पराक्रमी धाडसी योद्धा म्हणून घडविणार्‍या राजमाता जिजाऊ यांच्या जीवन चरित्रातील प्रसंग समाजासमोर सुजाण पालकत्वाचे आदर्श निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी आहेत.



यशस्वी जीवनासाठी आवश्यक मुल्य शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर देणे या उद्देशाने राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी दिनांक 3 जानेवारी ते 12 जानेवारी 2022 या कालावधीत विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये शाळा विद्यार्थी पालक लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रिय सहभाग घेण्यात येणार आहे. तसेच या अभियानाच्या कालावधीमध्ये शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.



या अनुषंगाने शालेय स्तरावर दिनांक 3 ते 12 जानेवारी 2022 या कालावधीत विविध इयत्तांच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक 3 आणि 12 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे तसेच राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन.


◼️ 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले आणि 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ माँसाहेब वेशभूषा 


◼️4 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तसेच किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन उदबोधन सत्र 


◼️5 जानेवारी रोजी विविध विषयावर निबंध लेखन 


◼️6 जानेवारी रोजी यशस्वी महिलांच्या यशोगाथा मुलाखती


◼️7 जानेवारी रोजी आनंदनगरी प्रदर्शन 


◼️8 जानेवारी रोजी चित्रकला आणि किल्ले 


◼️10 जानेवारी रोजी पोवाडा गायन तसेच समूह गायन उपक्रम 


◼️11 जानेवारी रोजी व्याख्याने व परिसंवादाचे आयोजन तर 


◼️12 जानेवारी रोजी एकांकिका एकपात्री नाटकांचे आयोजन करण्यात येणार आहे. 


विद्यार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा कार्यक्रमाचा दोन ते तीन मिनिटात पर्यांचा सुस्पष्ट व्हिडिओ फोटो व इतर साहित्य समाज संपर्क माध्यम यावर फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम व्हाट्सअप चा वापर करून अपलोड करण्यात यावा असे या संदर्भातील शासन निर्णयात म्हटले आहे. कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत शिक्षण संचालकांच्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित केल्या जातील असेही कळविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)