केंद्रप्रमुख 'शिवाजी दिगंबर खुडे' यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने ...

शालेयवृत्त सेवा
0

 






[ श्री.शिवाजी खुडे ३१ डिसेंबर २०२१ ला नियत वयोमानानुसार सेवानिवृत होत आहेत. एक शांत ,संयमी व निर्व्यसनी केंद्रप्रमुख म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या शिक्षकी पेशातील कारकिर्द सेवानिवृत्तीच्या निमित्ताने रमेश मुनेश्वर यांनी लिहिलेला लेख देत आहोत - संपादक ]



नांदेड जिल्ह्यातील किनवट आदिवासी डोंगरी क्षेत्रात ३७ वर्ष ४ महिने सेवा करून नियत वयोमानानुसार केंद्रप्रमुख  'शिवाजी दिगंबर खुडे' सेवानिवृत्त होत आहे. योगायोगाने आज त्यांचा जन्मदिवस म्हणून या दिवसाला त्यांच्यासाठी विशेष महत्त्व आहे.


सरांचा जन्म ३१ डिसेंबर १९६३ रोजी सोनपेठ कुट्टी बुद्रुक तालुका किनवट या छोट्याशा गावी सर्वसामान्य कुटूंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुळगाव कोसमेट येथे झाले तर माध्यमिक शिक्षण शासकीय आश्रम शाळा पाटोदा खुर्द येथे झाले. ३० ऑगस्ट १९८४ ला  शिक्षक म्हणून प्रथम नेमणूक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पाटोदा खुर्द येथे झाली. पुढे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थारा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्या शाळा किनवट , प्राथमिक शाळा नया कॅम्प किनवट येथे सहशिक्षक म्हणून सेवा केली. 


सरांचे वर्ग अध्यापन हे उत्कृष्ट.. विशेषतः सरांचे भूगोल या विषयावर प्रभुत्व ! संपूर्ण जगाची माहिती , नकाशावाचन , पृथ्वीचा गोल , खगोलीय माहिती इत्यादी म्हणून तालुकास्तरीय प्रशिक्षणात माहिती देत असे. तज्ञ मार्गदर्शक म्हणून सुद्धा शिक्षक प्रशिक्षणात त्यांचा सहभाग नेहमी असायचा. किनवट माहूर तालुका निर्मितीनंतर इयत्ता तिसरी अभ्यासक्रमासाठी भूगोल विषयाचे तज्ञ म्हणून बालभारती पुणे येथे सुद्धा त्यांनी काम पाहिले. संपूर्ण साक्षरता अभियानात सहसमन्वयक म्हणून कार्य केले व त्यासंबंधी त्यांचे काही लेख तेव्हा वर्तमानपत्रात सुद्धा प्रसिद्ध झाले  होते.



मुख्याध्यापक म्हणून ३० जून २००१ मध्ये सरांना पदोन्नती  प्राथमिक शाळा कन्याशाळा किनवट येथे  मिळाली. मुख्याध्यापक म्हणून त्यांनी आपल्या शाळेत सहकारी शिक्षकांच्या मदतीने विविध उपक्रम राबविले. त्या काळात कन्या शाळा म्हणजे नावलौकिक मिळवलेली तालुक्यातील शाळा होती. तत्कालीन शिक्षणमंत्री माननीय वसंत पुरके साहेब यांनी सदरील शाळेस उपचारात्मक वर्गास भेट देऊन विविध उपक्रमाचे पाहणी केली. आपल्या स्वहस्ते चांगला अभिप्राय दिला आणि शाळेला एक हजार रुपयाचे बक्षीस दिले. एका शिक्षण मंत्र्यांनी सरांचा केलेला कार्याचा हा सन्मान म्हणजेच कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा नक्कीच आहे. 


त्यानंतर त्यांनी केंद्रीय प्राथमिक शाळा वानोळा येथे कार्य केले. विशेषतः त्यांच्या काळात  शिष्यवृत्ती परीक्षेस अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले. तसेच त्यांनी पाटोदा (खु )पाटोदा (बु) येथेही सेवा बजावली. 


केंद्रप्रमुख म्हणून २१ जुलै २०१५ रोजी   केंद्र कमठाला येथे नेमणूक झाली. आणि आपल्या केंद्रातील बारा शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुणवत्ता वाढावी म्हणून विविध उपक्रम आणि स्पर्धाचे आयोजन केले. तसेच केंद्रातील सर्व शिक्षकांना नावाजलेल्या ज्ञानरचनावादी शाळा मनसळ तालुका पुसद ( यवतमाळ ) तसेच लातूर येथील काही उत्कृष्ट शाळांना  भेटी देऊन तेथील नाविन्यपूर्ण उपक्रम केंद्रातील सर्व शाळेमध्ये राबविले. सर्व शाळा ज्ञानरचनावादी -डिजिटल व रंगरंगोटी ने सुसज्ज करून सर्व शिक्षकांना कार्यरत ठेवले. सर्व शाळांना सातत्याने भेट देऊन सतत मार्गदर्शन सेवानिवृत्त पर्यंत चालू होते. केंद्रातील कोणत्याही शाळेत सर पाऊल टाकले की सरळ वर्गात विद्यार्थ्यांशी हितगुज करत त्यामुळे प्रत्येक गावचे विद्यार्थी सरांना नावानिशी आजही ओळखतात.



सरांचा स्वभाव शांत निर्व्यसनी व अध्यापनातील कर्तव्याला प्रामाणिकपणे  जपणारे म्हणुनच सरांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षक -शिक्षिका झाल्या. त्यांच्या बरोबर  म्हणून काम करण्याचा योग सरांना आला. तसेच विविध क्षेत्रात सरांचे विद्यार्थीही नाव कमविले आहे.


दरवर्षी आपल्या वाढदिवसाचे निमित्त केंद्रातील शिष्यवृत्ती नवोदय परीक्षार्थींना शैक्षणिक साहित्य व सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करीत असत. सरांनी आपली शैक्षणिक पात्रता सुद्धा डीएड, बीए, बीएड वाढवून स्वतःला सिद्ध केले. शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्य सुद्धा सरांनी केले. रेणुका पतसंस्थेचे संचालक, सामुदायिक विवाह मेळाव्यात सहभाग, कर्मचारी बचत गट स्थापन करून येणाऱ्या व्याजाचा उपयोग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत तसेच स्वतः रक्तदान करून सुद्धा योगदान दिले आहे .


त्यांच्या धडपडीची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. नांदेड जिल्हा परिषदेचा जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार ( 2007 )  किनवट पंचायत समितीकडून तालुका गुरू गौरव पुरस्कार (1997) आदिवासी युवक संघटना कडून समाज गौरव पुरस्कार (2007 )  जिल्हा परिषद  उत्कृष्ट शाळा पुरस्कार गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती किनवट तर्फे ( 2008 ) 


अशा या शांत सुस्वभावी सरांचं पुढील आयुष्य सुख शांतीने आनंदाचे जावो.. या मंगल कामनेसह त्यांना पुढील आयुष्यासाठी  हार्दिक शुभेच्छा देतो. !

- रमेश मुनेश्वर 

(शिक्षक,जि प प्रा शा लोणी ता. किनवट)



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)