आँनलाईन पद्धतीने गोरगरिबांच्या शिक्षणाची हत्या - डॉ. हेमंत कार्ले

शालेयवृत्त सेवा
0

 



जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनात परिसंवाद, कथाकथन रंगले !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

 आॅनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याची प्रक्रिया कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झाली असली तरी ही पद्धती मोठ्या प्रमाणावर अयशस्वी झालेली आहे. गत दोन शैक्षणिक वर्षात टाळेबंदीमुळे सगळ्यात जास्त शैक्षणिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. शाळा बंद शिक्षण चालू या नव्या संकल्पनेने आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची एकप्रकारे हत्याच केली असल्याचे मत येथील राष्ट्रीय /राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाचे । जिल्हाध्यक्ष डॉ. हेमंत कार्ले यांनी गोणार येथील पहिल्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनातील 'कोरोना काळाने शिक्षण व्यवस्थेपुढे निर्माण केलेली आव्हाने' या विषयाच्या परिसंवादात मांडले. 


मराठा आरक्षण दशा आणि दिशा या विषयावर बोलताना रमेश पवार आणि उद्धव सूर्यवंशी यांनी मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या ५८ मोर्चांचा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापर करून मराठ्यांच्या भावनांशी खेळ केला आहे. कोणत्याही सरकारने संविधानानुसार टिकणारे आरक्षण दिले नाही तर ते फसवेच होते. मराठा आरक्षणाची मागणी ही राजकीय नसून शिक्षण आणि नोकरीच्या संबंधाने आहे. मराठ्यांना आरक्षण हे आता ओबीसी कोट्यातूनच मिळायला हवे असा सूर लावला. यावेळी अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष उद्धव सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस रमेश पवार, प्रा. डॉ. रामकृष्ण बदने, निमंत्रक गंगाधर ढवळे यांची उपस्थिती होती. 


         

सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळ प्रणित नवयान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित कंधार तालुक्यातील गोणार मुक्कामी पहिल्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.‌ भाजपाचे लोकप्रिय खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्या सत्रात परिसंवाद संपन्न झाला. यावेळी डॉ. कार्ले बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले की, महागडे मोबाईल फोन गरीब पालकांनी खरेदी करणे एक दिवास्वप्नच होते. ते शक्य झाले नाही म्हणून मोठ्या मुलांचे शिक्षण सुटले.‌ ते मजुरी करु लागले.‌ मुलींच्या शिक्षणाला खिळच बसल्याने अत्यंत कमी खर्चात लग्न या सूत्रानुसार मुलींचे बालविवाह मोठ्या प्रमाणावर झाले. 


कारोना महामारिमुळे बालविवाह, बालमजुरी,शाळाबाह्य मुले या आव्हानांबरोबरच गरिबांची शिक्षण व्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झाली असून गरीब,वंचित आणि उपेक्षित समाज ऑनलाईन शिक्षण या आभासी दुनियेच्या परिघाबाहेरच राहिला आहे असे ते म्हणाले. याच परिसंवादात प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांनी कोरोनाकाळाने परिक्षा पद्धतीच बंद करून टाकली आहे यासंबंधाने मांडणी केली. 


तिसऱ्या सत्रात सामाजिक सलोखा व ऐक्याच्या सौंदर्यमूल्यावर आधारित कथाकथन रंगले. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार शिलवंत वाढवे यांनी बौद्ध आणि मराठा समाजाती दोन कुटुंबाच्या पिढ्यानपिढ्यांच्या माणूसकीच्या नातेसंबंधांवर आधारित 'सोयरिक' या कथेचे साभिनय सादरीकरण केले. तसेच स्वाती कान्हेगावकर यांनी हिंदू मुस्लिम एकात्मतेचा संदेश देणारी 'तेरे मुँडेर पर मेरे नाम का दिया' ही कथा सादर केली तर प्रा. डॉ. शंकर विभुते यांनी 'आमदार गणपतराव' ही अत्यंत विनोदी कथा सादर केली. कथाकथन सत्राच्या अध्यक्षस्थानी लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे मुख्य आयोजक पांगुळकार दिगांबर कदम यांची उपस्थिती होती. 


रसिक प्रेक्षकांच्या मनमुराद दाद, प्रतिसादात कथाकथन रंगले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागोराव डोंगरे, पांडूरंग कोकुलवार, गंगाधर ढवळे, कैलास धुतराज, शंकर गच्चे, मारोती कदम, बाबुराव पाईकराव, रुपाली वैद्य वागरे, श्रीकांत गोणारकर, अमोल गोणारकर, सोपान पवळे, रावसाहेब सुर्यवंशी, कुलदीप सुर्यवंशी, संदीप गोणारकर, हर्षवर्धन गोणारकर, बालाजी पवळे, पी.एस. पवळे, उत्तम वाघमारे, उत्तम ढवळे, शाहीर किशन डुबूकवाड, विक्रम पवळे, सय्यद खाजामियॉं, काशीराम पवळे, सोपानराव पवळे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)