प्रचंड उत्साह व प्रतिसादात 'आई बाबांची शाळा ' जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न..

शालेयवृत्त सेवा
0



नांदेड ( शालेयवृत्त ) :

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड आणि शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने "आई बाबांची शाळा - माझा पाल्य,माझी जबाबदारी " सर्वव्यापक, सर्वसमावेशक उपक्रमाच्या अंमलबजावणीचा शुभारंभ दि. 28 जुलै 2021 रोजी करण्यात आला. आज दि. 03 ऑगस्ट 2021 रोजी या उपक्रमाच्या अंतर्गत केंद्र स्तरीय सुलभकांचे जिल्हा स्तरावर ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न झाले.


 तीन स्तरीय प्रशिक्षणाच्या नियोजनानुसार आज जिल्हा स्तरीय प्रशिक्षणात केंद्र स्तरावर इयत्ता 1 ली व 2 री च्या शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या सुलभकांना प्रशिक्षण देण्यात आले. केंद्र स्तरावरील ऑनलाईन प्रशिक्षणानंतर शाळास्तरावर पालकांना ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे.


 जिल्हास्तरीय प्रशिक्षणात उपस्थित सुलभकांना शिक्षणतज्ज्ञ डॉ. रवींद्र अंबेकर, प्राचार्य, डाएट,नांदेड यांनी मार्गदर्शन करताना - या उपक्रमाचा मानसशास्त्रीय आधार विशद केला. कमीत कमी वेळ, श्रम,पैसा व जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पाहोचण्याची किमया ही ऑनलाईन मार्गात आहे. शैक्षणिक वर्ष 2021 - 22 मधील इयत्ता 1 ली व 2 री च्या विद्यार्थ्यांनी वर्गातील आंतरक्रिया अनुभवली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित संपादणूक क्षमता विकसित झाली नाही.अश्यावेळी या विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये पालकांचा सहभाग घेणे आवश्यक व महत्वाचे आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील शिक्षक व्हाट्सएपच्या माध्यमातून शेअर करत असलेल्या PDF, Videos, Links ई.व गृहभेटीत पालकांचा सहभाग घेत आहेत. यातून शिक्षकांनी पालकांसोबत भावनिक नातेसंबंध निर्माण केले आहे. 


गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालकांचा सक्रिय सहभाग घ्यावा लागेल.आई बाबांची शाळा या उपक्रमाला NEP - 2020, त्यातील पायाभूत साक्षरता व अंकज्ञान  FLN व NCERT च्या Home Schooling या संदर्भाचा अभ्यास करून शास्त्रीय पद्धतीने याची जोड देण्यात आली आहे. सन 2026 - 27 पर्यंत पायाभूत साक्षरता व अंकज्ञान( FLN ) हे उद्दिष्ट करण्यासाठी पालकांची पाल्यांच्या शिक्षणातील भूमिका व सहकार्य महत्वपूर्ण ठरणार आहे. जे पालक पाल्यांच्या शिक्षणासाठी वेळ देतात,अभ्यास घेतात त्या पाल्यांची संपादणूक पातळी इतर पाल्यांपेक्षा उंचावलेली दिसून येते म्हणून वर्गाला शिकवण्याचे दिवस गेले असून विद्यार्थ्यांना शिकविण्याचे दिवस आले आहेत.याकरिता कोविड काळात व कोविड नंतर पाल्यांच्या शिक्षणात पालकांची भूमिका महत्वाची आहे असे मौलिक मार्गदर्शन केले.


 उमेश नरवडे, अधिव्याख्याता तथा विभाग प्रमुख, डाएट,नांदेड यांनी आजच्या जिल्हास्तर प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात उपक्रमाचे स्वरूप, उद्दिष्टे ,व्याप्ती व त्रिस्तरीय प्रशिक्षणाची रूपरेषा विशद केली.



अतुल कुलकर्णी, गणित विषय सहाय्यक, डाएट,नांदेड यांनी कृति पुस्तिकेतील आठवडानिहाय कृती पालकांनी पाल्यासोबत काम करताना कश्या पद्धतीने पूर्ण करून घ्यावेत यासाठीचे व तद्अनुषंगिक शिक्षकांनी करावयाचे मार्गदर्शन, अध्ययन अनुभव संयोजनाचे  सुलभीकरण केले.


आजच्या जिल्हास्तरीय ऑनलाईन प्रशिक्षणासाठी डाएट मधील सर्व अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी,विषय साधन व्यक्ती, विषय तज्ञ, विशेष शिक्षक व केंद्र स्तरीय सुलभक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


MPSP मुंबई यांच्या सहयोगाने 1000 पार्टीसिपन्ट्सच्या झुम प्लॅटफॉर्म वर हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले त्यासाठी तांत्रिक साहाय्य  संतोष केंद्रे,आय टी विषय सहाय्यक, डाएट,नांदेड यांनी केले. प्रा. अभय परिहार यांने सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)