नांदेड ( मिलिंद जाधव ) :
व्यक्तीची प्रतिभा लपून राहत नाही. परिस्थिती कशी ही असो वा व्यक्ती कोणत्याही ठिकाणी, स्वतःच्या प्रतिभेला ओळखून जी व्यक्ती काम करते ती व्यक्ती भविष्यात नक्कीच प्रगती करू शकते. घरात कोणी कवी, लेखक किंवा साहित्यिकांचा वारसा नसताना देखील एका सामान्य कुटुंबात जन्मलेले नागोराव येवतीकर ह्यांनी साहित्याच्या क्षेत्रात स्वतःची प्रतिभा सिद्ध करून दाखविली आहे.
त्यांचे मुळगाव नांदेड जिल्ह्यतील धर्माबाद तालुक्यातील एकदम शेवटचे टोकाचे येवती हे असून सध्या ते पदवीधर विषय शिक्षक म्हणून धर्माबादच्या जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत कार्यरत आहेत. आपल्या शैक्षणिक कार्यासोबत त्यांनी साहित्य क्षेत्रात देखील विपुल कार्य केले आहे. गेल्या तीस वर्षांपासून ते सातत्याने लेखन करत आहेत. त्यांचे शैक्षणिक लेखासह वैचारिक, सामाजिक, कौटुंबिक लेख, कविता आणि कथा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि दिवाळी अंकातून प्रकाशित झाले आहेत. स्टोरी मिरर ऑनलाईन मंचावर त्यांचे शंभरच्यावर लघुकथा आणि तीनशेच्या आसपास कविता प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख बनविणारी स्टोरीमिरर ऑनलाईन मंचाने घेतली आणि त्यांना लिट्रेरी जनरल अशी उपाधी देऊन यापूर्वीच सन्मानित केले आहे. तसेच सध्या स्टोरीमिरर व क्लब महिंद्रायांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्कुल रायटिंग कॉम्पिटेशन सिजन 3 साठी नासा येवतीकर यांची ब्रँड एम्बेसडर म्हणून निवड करण्यात आल्याचे स्टोरीमिररच्या संयोजकांनी मेल करून कळविले आहे.
स्टोरीमिरर द्वारे त्यांना ब्रँड एम्बेसडर म्हणून निवड केल्याचे कळल्यावर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले, " गेल्या 30 वर्षांपासून सातत्याने लेखन करत असल्याचे फळ आज मिळाले. माझ्या असंख्य वाचकांनी मला लेखनासाठी नेहमीच प्रोत्साहित केले त्यामुळे मी लेखन करू शकलो. माझ्यासाठी हे एक सुवर्णक्षण असून वाचकांचे प्रेम आणि आशीर्वाद मी कधीही विसरू शकत नाही. तसेच मी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आवाहन करू इच्छितो की, स्वतःच्या प्रतिभेला ओळखून व्यक्त होण्याची संधी द्या. स्टोरीमिरर व क्लब महिंद्राने आयोजित केलेल्या या स्पर्धेत सहभागी व्हा. भरपूर वाचन करा आणि लेखन करून बक्षीस जिंकण्याची नामी संधी दवडू देऊ नका.
नागोराव येवतीकर हे नासा या टोपणनावाने सुपरिचित असून साहित्यिकांची नवी फळी तयार करण्यासाठी ' साहित्य सेवक ' नावाचा एक समूह गेल्या दोन वर्षांपासून चालवित आहेत. याच समूहातील नवोदित साहित्यिकांचे लॉकडाऊन रोजनिशी नावाचे ई बुक त्यांनी संपादन केले आहे. अनेक नवनवीन साहित्यिकांना ते नेहमीच प्रोत्साहन देण्याचे काम करतात. आजपर्यंत त्यांची स्वतःची दहा पुस्तके प्रकाशित झाली असून त्यात दोन कवितासंग्रह आणि तीन कथासंग्रहाचा समावेश आहे. मराठी भाषेच्या समृद्धीसाठी ते नित्य नवनवीन उपक्रम राबवित असतात. रोज एक कविता या उपक्रमातून त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये कवितेच्या बाबतीत रुची निर्माण करण्यात यश मिळविले आहे. त्यांच्या या उपक्रमाला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्याकडून गौरव देखील झाला आहे.
नासा येवतीकर यांची ब्रँड एम्बेसडर पदी निवड झाल्याबद्दल प्रसिद्ध विनोदी साहित्यिक नागेश शेवाळकर, अरुण देशपांडे, डॉ. हनुमंत भोपाळे, सौ. भारती सावंत या साहित्यिकांसह शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत असून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .