Olympic आठवणी :
नुकतेच माणिपूरच्या मीराबाई चानूने जपानमध्ये चालू असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमधील रौप्यपदक मिळवलं. ती वेटलिफ्टिंगकडे कशी वळली याची मोठी रंजक कहाणी आहे.
माणिपूरमधील एका छोट्याशा खेड्यात जन्माला आलेल्या मिराबाईच्या आईने मिराबाईला वेटलिफ्टर बनवायचे ठरविले होते.अर्थात मीराबाईमधील वेटलिफ्टिंगचे कौशल्य तिच्या आईच्या लक्षात आले होते.मीराबाईच्या घरी स्वयंपाकासाठी इंधन म्हणून सरपण वापरत असत.सरपणासाठी लागणारी लाकडे जंगलामधून गोळा करून आणण्याचे काम मीराबाई व तिच्या भावंडावर असे. मीराबाई तिच्या वजनापेक्षा अधिक वजनाची लाकडाची मोळी सहज उचलून डोक्यावर घेत असे आणि घरी घेऊन जात असे.यातूनच तिच्यात एक वेटलिफ्टर दडला असल्याचा साक्षात्कार तिच्या आईला झाला असावा.
आईने जरी मिरबाईला वेटलिफ्टर बनवायचे ठरविले असले,तरी मिराबाईला मात्र तिरंदाज व्हायचे होते.पण एके दिवशी तिच्या आयुष्याला कलाटणी मिळणारी घटना घडली.इ.8वीच्या पुस्तकातील कुंजराणी देवीवरील धडा तिने वाचला.कुंजराणी देवी-माणिपूरमध्येच जन्माला आलेली,अर्जुन पुरस्काराने गौरविलेली भारतीय वेटलिफ्टिंगमधील पहिली सुपरस्टार होय.पुस्तकातील कुंजराणीच्या जीवनावरील धडा वाचून मीराबाई प्रचंड प्रभावित झाली.तिच्या जीवनाचे ध्येय ठरले.आपणही कुंजराणीप्रमाणे वेटलिफ्टर बनायचे असे तिने मनोमन ठरविले.
विद्यार्थी मित्रांनो, यातून आपण एक बोध घेतला पाहिजे.शालेय पाठ्यपुस्तकातील धडे केवळ परीक्षेसाठी नसतात,तर जीवनात यशस्वी होण्यासाठी असतात.मिराबाईने आठवीच्या पुस्तकातील धड्यातून धडा घेतला आणि जीवनात यशस्वी झाली.स्वतःचे आणि देशाचे नाव उज्वल केले.आपणही आपल्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास केवळ परीक्षेसाठी न करता,जीवनात यशस्वी होण्यासाठी केला पाहिजे.खरे तर शिक्षणाचा हेतूच व्यक्तीमत्व विकास हा आहे.स्वामी विवेकानंदांच्या मते,'Education is the process by which character is formed,strength of mind is increased,and intellect is sharpened, as a result of which one can stand on one's feet'.
दुर्दैवाने आपण शिक्षणाचा संबंध नोकरीशी आणि परीक्षांचा संबंध मार्कंशी जोडल्यामुळे,आपण खऱ्या शिक्षणापासून वंचित राहतो.अभ्यास करायचा तो परीक्षेसाठी आणि परीक्षा द्यायची ती मार्कांसाठी हा समज दृढ झाल्यामुळे काही कारणास्तव परीक्षा रद्द झाल्या,तर आपण आपल्या अभ्यासालाच पूर्णविराम देतो.
शिक्षण ही निरंतर चालणारी गोष्ट आहे.अभ्यासाला इंग्रजीमध्ये exercise असेही म्हणतात.Exercise हा नियमीत करायचा असतो. शिक्षणाची प्रक्रिया ऑनलाइन असो की ऑफलाईन, परीक्षा होवो अथवा न होवो,आपण आपला अभ्यास नियमित चालू ठेवला पाहिजे.आपल्या पाठ्यपुस्तकात असणारे यशस्वी व्यक्तिंच्या जीवनावरील धडे नीट अभ्यासले पाहिजेत.त्या धड्यातले धडे आपण आपल्या जीवनामध्ये गिरवले पाहिजेत.
- भाऊसाहेब माने
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .